गणेश भक्तांच्या हृदयातील गणरायाला मूर्त स्वरूप देताना, प्रथम मूर्तिकारकाला डोळे बंद करून, मूर्ती स्वतःच्या अंतःकरणात पहावे लागते. मनात रुजवावी लागते, डोळ्यात साठवावी लागते, तदनंतर गणेश भक्तांच्या भक्तीला उधाण आणणारी देहवान विसरून पाहत रहावं अशी सुंदर मूर्ती मातेतून साकारली जाते. या मूर्तिकारांच्या दुनियेतील असामान्य प्रतिभा असलेले कलावंत म्हणून श्याम सारंग, वेलिंग मास्टर आणि विजय खातू यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. या त्रयींच्या कलाकृतीकडे पाहून वाटतं की यांनी साक्षात गणराय पाहिला नव्हे तर या तीन अवलीयांना गणरायांनी प्रथम दर्शन दिले. गणेश मूर्तीकारांच्या क्षेत्रातील ही दादा मंडळी. मातीला देवपण देणारा या अलौकिक प्रतिभावंतांच्या मूर्तीतील समान धागा मूर्तीतील जिवंतपणा.
शतक महोत्सव साजरा करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ७० टक्के मूर्तीची निर्मिती या त्रयींनी केली. चेहऱ्यावरील सात्विक भाव, देखनेपणा , सुबकता ,प्रमाणबद्धता आणि प्रथमदर्शनींच मूर्तीच्या प्रेमात पडावा असं गोंडस रूप ही श्याम सारंग यांच्या मूर्तीची खासियत.१९५३ ते १९६९ या कालखंडासाठी त्यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळासाठी अप्रतिम मूर्ती व सोबतचे देखावे घडविले.१९५३ साली त्यांनी मंडळासाठी घडवलेली शेषनागावरील १७ फूट उंचीची गणरायाची मूर्ती उभ्या महाराष्ट्रात लक्षणीय तद्वत स्मरणीय ठरली. या देखाव्यात जिवंतपणा आणण्यासाठी त्यांनी चक्क जिवंत माणसांना पुतळे रुपात मूर्ति शेजारी उभे केले होते.
सत्तरच्या दशकात भव्य आणि उंच गणेश मुर्त्या हा मुंबईतील गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. त्याचे प्रणेते होते मूर्तिकार दिनानाथ वेलिंग तथा वेलिंग मास्तर. उंच,प्रमाणबद्ध बॅलन्स, शरीररचना शास्त्राच्या आराखड्यानुसार (परफेक्ट अनॉटॉमी) घडविलेल्या भव्य आणि उंच मूर्ती वेलिंग मास्तरांची खासियत होती. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मधून शिल्पकलेचा डिप्लोमा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते.१९७१ ते १९८६ या कालावधीत त्यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळासाठी उत्तमोत्तम गणेशमूर्ती आकर्षक देखावे सादर केले.१९८६ साली त्यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळासाठी साकारलेला गंगा अवतरणाचा देखावा पाहण्यासाठी मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. गणेश मूर्ती उंच भव्य तर होतीच पण परिपूर्णतेच्या बाबतीत अचूक होती. पिळदार शरीरयष्टीचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरील रागीट भाव त्यांनी अचूक टिपले होते. वेलिंग मास्तरांचे निधनानंतर म्हणजेच १९८७ साली विजय खातू नावाच्या तरुण आणि कल्पक मूर्तिकराचा उदय झाला. अल्पावधीतच एका झंजावाताप्रमाणे त्यांनी मुंबई,नाशिक,पुणे या शहरांमध्ये आपले अधिराज्य निर्माण केले. आतून मी गणपतीच्या मूर्ती समोरील देखाव्यांना छेद देत फक्त भव्य गणेशमूर्ती साकारण्यास प्राधान्य दिले.
वेलिंग मास्तरांप्रमाने प्रमाणे खातूनी कोणतेही शास्त्रशुद्ध मूर्ती बनवण्याचे शिक्षण घेतले नव्हते. वेलिंग मास्तरांचा खातुंवर प्रचंड प्रभाव होता. मूर्ती घडवण्याचा वारसा त्यांना त्यांच्या मूर्तिकार वडिलांकडून मिळाला. वेलिंग मास्तर किंवा समकालीन मूर्तिकारांच्या कामाचे निरीक्षण करणे , प्रसंगी त्यांचे मार्गदर्शन घेणे, तद्वत प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी त्यांच्यातील मूर्तिकार घडवला. वेलिंग मास्तर आणि धर्माजी पाटकर यांना खातू गुरुस्थानी मानत. गणेशमूर्तीचे बोलके डोळे ही त्यांची खासियत होती. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळासाठी त्यांनी १९८७ ते २००७ या कालावधीत उत्तमोत्तम अविस्मरणीय मुर्त्या घडविल्या. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची वीणावादन करणारी मूर्ती, चंदनवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाची मोरावरील मूर्ती, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंतामणी.... इत्यादी कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट मूर्तिकार हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव केला. प्रतिवर्षी कमीत कमी ५०० मुर्त्या ते साकार करत असत. या महान कलाकाराच्या एक्झिट नंतर त्यांची कन्या रेश्मा खातू यांनी १०० वर्षाची अप्रतिम चिंतामणी ची मूर्ती घडविली.