आमच्या बद्दल

Image

मंडळाचा इतिहास

स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी आणि जागृत ठेवण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९२० साली झाली. आज या गोष्टीला १०५ वर्षे पूर्ण होत आहेत. या १०५ वर्षाच्या कालावधीत मंडळाने तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली.पण मंडळ नेटाने उत्सव साजरा करीत राहिलं आणि लोक जागृतीही. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे मुंबईतील दुसर सर्वात जुन मंडळ आहे. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्थापनेला कारुण्याची किनार आहे. लोकमान्य टिळकांचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले आणि संपूर्ण भारतावर एक शोककळा पसरली. परकीय सत्तेविरुद्ध असंतोष, स्वराज्याची ओढ ,आत्मियता व जाज्वल्य देशभक्ती लोकमान्यानीच सर्वार्थाने जागवली. धार्मिक उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देऊन त्यांनी देश संघटित केला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली सामाजिक-राजकीय पोकळी भरून काढणे फार गरजेचे होते. ही सुप्त जाण त्या काळातील युवकांमध्ये होती. चिंचपोकळी-लालबाग-परळ हा भाग गिरण्यांचा. येथील गिरणी कामगार पारतंत्र्यात पिचला होता म्हणून स्वदेशाभिमानाचे स्पुलिंग त्यांच्यात फुलले होते.

टिळकांना आदरांजली वाहण्यासाठी ६ सप्टेंबर १९२० रोजी लोकमान्यांचा आदर्श बाळगणारे त्यावेळचे या विभागातील कै.दत्ताराम अर्जुन पुजारी,कै.महादेव बसनाक, कै.दत्ताराम रामचंद्र मयेकर, कॅप्टन.ल. त्र्यं.पाटणकर इत्यादीं मंडळींनी मंडळ स्थापनेत पुढाकार घेतला आणि स्थापन झालं चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. नंतर कै.पांडुरंग म्हसकर, कै.गुणाजी सिताराम बागवे,कै.लक्ष्मण चव्हाण यांनी या कार्याची धुरा समर्थपणे पेलली. आता पुढे काय ......आपण काय करणार.... काय करायला हवं... अशा प्रश्नांचे मोहोळ या तरुणांच्या डोक्यावर होतं. अवघ्या १० दिवसात पहिल्या गणेशोत्सवाची तयारी मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी केली आणि १६ सप्टेंबर या गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडळाने गणरायाची प्रतिष्ठापना केली. लक्ष्मीनारायण व्यायामशाळा ते काळाचौकी रोड आणि शिवडी ते भारतमाता टॉकीज हे मंडळाचे प्रारंभीचे कार्यक्षेत्र होते.

केवळ चार आणे वर्गणीवर मंडळाने हा उत्सव सुरू केला.मंडळाच्या पहिल्या श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली ती 'डेक्कन कोर' च्या जागेत. त्यानंतर १९ वर्षांनी मंडळाला नवी जागा मिळाली ती चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस रेल्वे हद्दीच्या भिंती लगत. तेव्हापासून याच जागेत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. पहिली पाच वर्षे कुठलाही पदाधिकारीं न नेमता सर्व कार्यकर्त्यांनी संघटित नेतृत्वाच्या संकल्पनेवर मंडळाचे कामकाज चालवले. मंडळाने आपल्या कार्याला अधिकाधिक वेळ देणाऱ्या केवळ महोत्सवपूर्व व महोत्सव काळातच नव्हे, तर वर्षभर मंडळाच्या कार्याला वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज भासल्याने अशा कार्यकर्त्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात यावी असे ठरले. मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून १९२६ साली श्री.गणपत सीताराम कामत यांना मान मिळाला. प्रारंभीच्या काळात मंडळ कार्यकर्त्यांकडून चार आणे वर्गणी घेत असे.या चार आण्यांच्या थेंबातून आर्थिक तळे साचू लागले. त्यातूनच मंडळांने हाती घेतलेले व्रत सुरू राहिले आणि १९४५ साली मंडळाने आपला रजत जयंती उत्सव साजरा केला..१९५६ साली मंडळाची घटना तयार झाली व मंडळाचे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे व्यापक नाव देण्यात आले. उद्देश एवढाच की, मंडळाचे कार्य गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता मंडळ वर्षभर कार्यरत रहावे. १९५६ साली मंडळाचा नवरात्रौत्सव सुरू झाला. मंडळाच्या कार्याचा आज इतका व्याप व खर्च वाढूनही त्यावेळेपासून फक्त गणेशोत्सवात एकदाच वर्गणी काढून वर्षभर मंडळ कार्यरत ठेवण्याची परंपरा आजतागायत कायम आहे.